
मुक्तीपथतर्फे व्यसनमुक्ती मॅरेथॉन ; विद्यार्थ्यांनी घेतला तंबाखूमुक्तीचा संकल्प
गडचिरोली : विद्यार्थ्यांचे भविष्य व्यसनमुक्त आणि सुखमय व्हावे, या उद्देशाने कोरची तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा कोटगुल येथे ‘मुक्तीपथ अभियान’ अंतर्गत तंबाखू व खर्रा मुक्त शाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत सामाजिक परिवर्तनाचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान माहिती फलक आणि प्रबोधनात्मक गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. केवळ उपदेश न देता, प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यासाठी व्यसनमुक्ती मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शाळेतील युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मॅरेथॉननंतर उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि युवकांनी आपला परिसर, समाज आणि शाळा व्यसनमुक्त करण्यासाठी सामूहिक शपथ घेतली. व्यसनांच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदाचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी मुक्तीपथ प्रतिनिधी युवनाथ मेश्राम यांनी व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देत व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक सुनील कुलसंगे, अरविंद करंगामी, मोहिनी कडते, रनेश कोरचा, देविदास पदा, महेश अवरासे आणि निखील कुलसंगे उपस्थित होते. या उपक्रमामुळे शाळा परिसरात उत्साहाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता निर्माण झाली आहे.



