गडचिरोलीविदर्भ

देसाईगंजमध्ये जेएसडब्ल्यू प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध ; लोकशाही मार्गाने आंदोलनाचा निर्णय

हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ‘एक इंचही जागा नाही‘ चा ठराव संमत ; स्थानिकांना रोजगाराचे ‘फोल आश्वासन‘ आणि प्रदूषणाचा मुद्दा

देसाईगंज : विकासाच्या नावाखाली देसाईगंज तालुक्यात येऊ घातलेल्या जेएसडब्ल्यू (JSW) प्रकल्पाला बाधित शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. कुरुड येथील झुरे मोहल्ल्यात आयोजित शेतकरी सभेत कुरुड, कोंढाळा आणि शिवराजपूर येथील हजारो शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पासाठी जागा न देण्याचा सर्वानुमते ठराव संमत केला आहे. प्रसंगी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी आयोजित या सभेत, उपस्थित शेतकऱ्यांनी प्रकल्पाला प्रखर विरोध दर्शवत आपली मते मांडली. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल अशी ‘फोल आश्वासने’ देऊन मोठमोठी जंगले आणि वनसंपदा नष्ट करून प्रकल्पांसाठी जागा अधिग्रहित करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. प्रत्यक्षात मात्र, कुशल कामगार उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून येथील शेती व उद्योग संपवून परप्रांतीय कुशल, अकुशल कामगार आणले जातात आणि प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण मात्र येथील नागरिकांच्या माथी मारले जात असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले. याच कारणांमुळे प्रकल्पाला एक इंचही जागा न देण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला.

या सभेत भूमिअधिग्रहण प्रक्रिया मागील चार-पाच वर्षांपासून सुरू असल्याचे समोर आणण्यात आले. येथील शेतकऱ्यांची वास्तविक स्थिती स्थानिक लोकप्रतिनिधींना माहीत असतानाही देसाईगंज तालुक्यातील बाधित तब्बल ९ गावांमधील किमान ग्रामसभांना विश्वासात का घेण्यात आले नाही, असा संतप्त प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.

या सभेला देसाईगंज तालुक्यातील कुरुड, कोंढाळा आणि शिवराजपूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाधित ९ गावांमध्ये समित्या गठीत करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. यावेळी दिगांबर मेश्राम, लीलाधर भर्रे, विनायक पारधी, विलास ठाकरे, कुणाल ठाकरे, शालिकराम मिसार, विठ्ठल अवसरे, मनोहर निमजे, विठ्ठल ढोरे, धनपाल पिलारे, अमरदीप मेश्राम, डॉ. जयंत उके, मंगेश गणवीर, भाऊराव पत्रे, विलास दोनाडकर, यादव फटींग, शामराव ढोरे, नामदेव मिसार, पिंटू पारवेकर, मुरारी दोनाडकर यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेला हजारो शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button