
कोरची: नगर पंचायतीच्या ढेपाळलेल्या कारभाराचा निषेध करत कार्यालयाला कुलूप ठोकणाऱ्या भाजपच्या दोन नगरसेवकांसह पाच जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी घडलेल्या या नाट्यमय घडामोडींनंतर, बुधवारी सर्व आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
कोरची नगर पंचायतीचा कारभार गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक शैलेंद्र बिसेन व निरा बगवा यांच्यासह काही नागरिकांनी मंगळवारी दुपारी नगर पंचायत कार्यालयावर धडक दिली. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून त्यांनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला चक्क कुलूप ठोकले. या आंदोलनानंतर त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकाराची माहिती दिली. मात्र, शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी पाच मुख्य आरोपींसह इतर काही आंदोलकांवर गुन्हे दाखल केले.
आंदोलक नगरसेवक आणि नागरिकांच्या मते, नगर पंचायतीच्या कारभारात मोठी अनागोंदी माजली आहे. त्यांनी शहरातील वीज आणि स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यास अडचणी येत आहेत. विकास निधीचा विनियोग योग्य प्रकारे केला जात नाही. प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार गणेश सोनवाणे यांचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याचा आरोप केला.
या प्रकरणी नगरसेवक शैलेंद्र बिसेन, निरा बगवा, तसेच नंदू वैरागडे, शालिकराम कराळे आणि आत्मसमर्पित माओवादी निरिंगसाय मडावी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. नगरसेविका निरा बगवा यांना मंगळवारीच घरी पाठवण्यात आले होते, मात्र इतर चौघांना कागदपत्रांच्या अभावी रात्र पोलीस कोठडीत काढावी लागली. बुधवारी घरपट्टी पावती व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला.
बुधवारी सकाळी नगर पंचायत प्रशासनाच्या विनंतीवरून पोलिसांनी कार्यालयाचे कुलूप तोडण्यास मदत केली. त्यानंतर कार्यालयाचे दैनंदिन कामकाज पूर्ववत सुरू झाले. लोकप्रतिनिधींनीच चक्क नगर पंचायतीला कुलूप ठोकल्याने संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.



