
नवयुवक किसान गणेश मंडळाचा सामाजिक उपक्रम, अनेकांनी घेतला लाभ
देवरी : गणेशोत्सवाच्या धामधुमीतही सामाजिक बांधिलकी जपत, देवरी येथील श्री नवयुवक किसान गणेश मंडळाने ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या अभियानांतर्गत एका मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सूचनेनुसार, हे शिबिर नागरिक आरोग्यवर्धिनी केंद्र, देवरी यांच्या सहकार्याने पार पडले.
या शिबिरात नागरिकांची केवळ सामान्य तपासणीच नव्हे, तर रक्तदाब, मधुमेह, आणि सिकलसेल सारख्या गंभीर असंसर्गजन्य रोगांचीही तपासणी करण्यात आली. शिबिरादरम्यान आरोग्य तपासणी, प्रयोगशाळा तपासणी, समुपदेशन आणि औषधांचे वितरणही करण्यात आले.
नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यशवंत भोंगाडे आणि डॉ. यशस्वी चौरसिया यांनी तपासणीची जबाबदारी सांभाळली. त्यांनी विशेषतः किशोरवयीन मुली आणि महिलांना ॲनिमिया, किटकजन्य आजार आणि स्वच्छतेचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. महालॅबचे लॅब टेक्निशियन शीतल पटले यांनी रक्त शर्करा आणि सिकलसेलची तपासणी केली, तर स्टाफ नर्स निशा वैद्य यांनी रक्तदाबाची तपासणी केली.
या शिबिराचे यशस्वी आयोजन श्री नवयुवक किसान गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने झाले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गणेशोत्सवाचा वापर करणाऱ्या या मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



