
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्रातर्फे नादब्रम्ह निर्मित आणि युगसंधान प्रस्तुत ‘युगप्रवर्तक – डॉ. हेडगेवार’ या नाटकाचे सादरीकरण झाले. या हिंदी भाषेतील द्विअंकी नाटकाला गडचिरोली शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राष्ट्रप्रेमासाठी डॉ. हेडगेवारांनी दिलेले समर्पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती व संघाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी घेतलेले अखंड परिश्रम आणि राष्ट्राप्रती असलेली त्यांची बांधिलकी यांचे प्रभावी सादरीकरण या नाटिकेच्या माध्यमातून झाले.
नाटिकेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा व गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. बोकारे यांनी गडचिरोली हे कुठलाही उपक्रम सुरू करण्याचे आरंभस्थान झाले असून, ‘युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार’ नाटिकेच्या भारत भ्रमणाची सुरुवात गडचिरोलीतून झाली आहे. ही खऱ्या अर्थाने गडचिरोलीच्या विकासाची नांदी आहे, असे मत व्यक्त केले.

‘युगप्रवर्तक – डॉ. हेडगेवार’ नाटिकेतून डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा संपूर्ण जीवनपट उभा केला आहे. डॉ. हेडगेवारांच्या संस्कारांमुळे देशाला एक योग्य दिशा प्राप्त झाली व अनेक स्वयंसेवक घडले. डॉ. हेडगेवारांच्या जीवनातील अनेक प्रसंग, तत्कालीन क्रांतिकारक व विचारवंतांशी त्यांची झालेली वैचारिक चर्चा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यांनी केलेली उभारणी, हिंदू धर्मातील केलेली जनजागृती, अस्पृश्यता निवारणासाठी घेतलेले परिश्रम आणि त्यांचे राष्ट्रप्रेम हे या नाटिकेतून प्रभावीपणे सादर केले गेले.
नाटिकेचे लेखन डॉ. अजय प्रधान यांनी केले असून, दिग्दर्शन व नेपथ्य सुबोध सुर्जिकर आणि संगीत शैलेश दाणी यांचे आहे. नाटिकेचे निर्माते पद्माकर धानोरकर असून, २५ ते ३० कलाकारांचा संच या अडीच तासांच्या हिंदी नाटकाद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. निर्मात्यांनी डॉ. हेडगेवारांचा प्रवास अतिशय मार्मिक व तटस्थपणे दाखवला आहे.
या नाट्यप्रयोगाच्या यशस्वी आयोजनासाठी गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. चैतन्य शिनखेडे यांनी अथक परिश्रम घेतले. नाटकाच्या सुरुवातीला प्रास्ताविक व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी यांनी केले, तर आभार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राचे प्रस्तावक यश बांगडे यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हेमराज निखाडे यांनी केले.
या नाट्यप्रयोगप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, माजी आमदार कृष्णा गजबे, प्रांत सेवा प्रकल्प प्रमुख सुनीलजी मेहेर, विभाग संघचालक प्रा. जयंतराव खरवडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत दोंतुलवार, सिनेट सदस्य संजय रामगीरवार, प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, डॉ. रुपेंद्रकुमार गौर व स्वरूप तारगे आदींसह गडचिरोली शहरातील व जिल्ह्यातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



