
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती
चंद्रपूर : राज्याचे माजी अर्थमंत्री, वनमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेल्या २८० कोटी रुपये किमतीच्या चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा येत्या २२ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या शुभहस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभणार आहे.
“विकास हा धर्म” आणि “समाजहित हे ध्येय” या धोरणातून कार्यरत असलेल्या आ. मुनगंटीवार यांनी अर्थमंत्रीपदावर असताना या लोककल्याणकारी प्रकल्पाचा जोरदार पाठपुरावा केला. १७ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर येथे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान (DMFT), राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने २८० कोटी रुपये खर्चातून हे रुग्णालय पूर्णत्वास आले आहे.
पूर्व विदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य घटकांसाठी हे अत्याधुनिक केंद्र नवजीवनाचा आधार आणि आशेचा किरण ठरणार आहे.
चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल हे पूर्व विदर्भातील सर्वात सक्षम, सुसज्ज आणि पूर्णत्वाने ‘कॅन्सर केअर’ देणारे केंद्र ठरणार आहे: क्षमता आणि क्षेत्रफळ: तळमजला + ४ मजले रचना आणि १४० बेड क्षमतेचे अत्याधुनिक उपचार केंद्र (अंदाजे १,००,०००+ चौ.फुट क्षेत्रफळ). सुसज्ज तंत्रसामग्री: सीटी सिम्युलेटर (CT-S) आणि २ रेषीय प्रवेगक (Linear Accelerators). मॅमोग्राफी, 3D/4D अल्ट्रासाऊंड आणि ब्रेकीथेरपी. सीटी – १६ स्लाइस आणि स्पेक्ट, डिजिटल एक्स-रे. विशेष विभाग: केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि हिस्टोपॅथोलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) तसेच रक्तविज्ञान (Haematology) यांसारख्या आधुनिक प्रयोगशाळांचा समावेश आहे.
आ. मुनगंटीवार यांनी केवळ कॅन्सर हॉस्पिटलच नव्हे, तर जिल्ह्याच्या संपूर्ण आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या प्रयत्नातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय (GMCH) सोबतच, १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारत बांधकामांना मंजूरी मिळाली आहे. बल्लारपूर, पोंभुर्णा येथे ग्रामीण रुग्णालय तसेच मूळ येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन यांसारखे महत्त्वाचे आरोग्य प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत.
आ. मुनगंटीवार यांच्या विनंतीला मान देत सरसंघचालक मोहन भागवत यांनी २२ डिसेंबर रोजी लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.



