
डेअरी, ज्वेलरी, फास्ट फूड आणि जनरल EDP क्षेत्रात रंगली स्पर्धा; बँक ऑफ इंडिया आरसेटीचा स्तुत्य उपक्रम.
भंडारा : ग्रामीण भागातील युवकांच्या हाताला कौशल्य देऊन त्यांना आत्मनिर्भर करणाऱ्या बँक ऑफ इंडिया आरसेटी (RSETI), भंडारा येथे “कौशल्य व ज्ञान विभागीय स्पर्धा – २०२६” अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. विविध जिल्ह्यांतून आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या अंगभूत कौशल्याचे सादरीकरण करत या स्पर्धेत हिरिरीने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि ई़डीपी (EDP) प्रशिक्षक विलास पोतदार यांनी प्रशिक्षणार्थ्यांना प्रोत्साहित करताना मोलाचा संदेश दिला. ते म्हणाले, “स्पर्धा म्हणजे केवळ जिंकणे किंवा हरणे नसून ती स्वतःमधील क्षमता ओळखून सातत्य व मेहनतीच्या बळावर अधिक सक्षम होण्याची संधी आहे. चिकाटी, प्रयत्न आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतीही व्यक्ती यशाचे शिखर गाठू शकते.”
ही विभागीय स्पर्धा चार मुख्य घटकांमध्ये विभागण्यात आली होती: १. डेअरी (Dairy): दुग्धव्यवसायातील तंत्र आणि व्यवस्थापन. २. ज्वेलरी (Jewelry): दागिने घडवण्याची कला आणि बारकावे. ३. फास्ट फूड (Fast Food): खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि सादरीकरण. ४. जनरल ई़डीपी (General EDP): उद्योजकता विकास आणि सामान्य ज्ञान. या चारही क्षेत्रांतील प्रशिक्षणार्थ्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या कौशल्याचे सादरीकरण केले. परीक्षकांनी प्रत्येक सादरीकरणाचे बारकाईने मूल्यमापन केले.
याप्रसंगी परीक्षक म्हणून नागेश आष्टीकर (निर्देशक, आरसेटी गडचिरोली), अब्दुल नासिर (निर्देशक, आरसेटी गोंदिया), विलास पोतदार, चंद्रकांत कोसारे (शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया), इंदिरा देशमुख (ज्वेलरी परीक्षक), प्रतिमा देशमुख (फास्ट फूड परीक्षक) आणि यशपाल चावरे (डेअरी परीक्षक) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच ‘उमेद’ अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक दिलीप पाटील यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.
कार्यक्रमाचे संचालन प्रेषित गजभिये यांनी केले, तर आभार प्रदर्शन आरसेटीचे निर्देशक मंगल निमजे यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी इरफान पठाण, चंद्रकांत हत्तीमारे, मंगेश गजभिये, तुषार पिल्लेवान यांच्यासह बँक ऑफ इंडिया आरसेटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



