
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता
गडचिरोली : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशभरात सुरू असलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने, अँटी करप्शन ब्युरो (ACB), गडचिरोलीच्या वतीने गोंडवाना विद्यापीठात ‘लाच तथा भ्रष्टाचाराबाबत कार्यशाळा तथा चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जागरूकता निर्माण करण्यात आली.
या कार्यशाळेला कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीचे पोलीस उपअधीक्षक विक्रांत सगणे आणि पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यशाळेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्य, उद्देश, लोकसेवकांकडून होणारा भ्रष्टाचार, लाचेचे प्रकार आणि त्याचे दुष्परिणाम यावर सविस्तर माहिती देण्यात आली. पोलीस उपअधीक्षक विक्रांत सगणे यांनी नागरिकांनी भ्रष्टाचार आणि लाच मागणीबाबत तक्रार कशी करावी, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास, तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
कार्यक्रमाच्या समारोपात पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच, जनजागृती आणि प्रबोधनासाठी पत्रके वाटून ती स्थानिक व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रकाशित करण्याची विनंती केली. या कार्यशाळेला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.



