
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील हालेवारा येथील हॉटेलमधून दारूविक्री होत असल्याची माहिती मिळताच, हालेवारा पोलिस व मुक्तीपथ टीमने संयुक्त कृती करीत देशी विदेशी दारू जप्त केली. याप्रकरणी मनोज सरदार या व्यवसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
गावातून पूर्णपणे दारू हद्दपार करण्यासाठी मुक्तिपथ गावसंघटनेकडून विशेष कृती कार्यक्रम राबविले जात आहेत. नुकतीच हालेवारा गावात स्थापन झालेली मुक्तिपथ शक्तिपथ संघटनेने दारूविक्री बंदीचा ठराव पारित केला. अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दारूविक्रेत्यांना संघटनेच्या माध्यमातून देण्यात आल्या. गावाच्या या निर्णयाला न जुमानता एक हॉटेल व्यवसायिक दारूविक्री करीत होता. दरम्यान, हालेवारा पोलिस विभाग व मुक्तिपथ तालुका चमू व गावसंघटना यांनी संयुक्त शोधमोहीम राबवून गावातील मनोज सरदार याचे हॉटेलची झडती घेतली असता विदेशी दारू गोवाचे 7 बॉटल, रॉयल स्टॅगचे 2 बॉटल, रॉकेट देशी दारूचे 31 निपा आढळून आल्यात. याप्रकरणी दारू जप्त करून आरोपी मनोज सरदार याच्यावर हालेवारा पोलिस मदत केंद्र येथे गुन्हा दाखल करण्यात आला.



