
नगराध्यक्ष सचिन शेंडे यांचे पाच वर्षांसाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन ; फिट इंडिया आणि पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश
गोंदिया : आरोग्य, पर्यावरण रक्षण आणि सामाजिक एकतेचा संदेश घेऊन गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने डोंगरगड सायकल वारी करणाऱ्या गोंदियातील ‘सायकलिंग संडे ग्रुप’च्या प्रवासाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या गौरवशाली टप्प्यानिमित्त गोंदियातील हॉटेल जिंजर येथे एक भव्य आढावा बैठक आणि सायकलस्वारांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून गोंदिया नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन शेंडे, नगरसेवक अमर रंगारी, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर पर्वते, ज्येष्ठ पत्रकार भोला गुप्ता, धावपटू मुनलाल यादव आणि सायकलिस्ट अशोक मेश्राम उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डोंगरगड सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व सदस्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
आपल्या भाषणात नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी सायकलिंग संडे ग्रुपच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “हा ग्रुप केवळ फिटनेससाठी काम करत नाही, तर पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक एकतेचा सुंदर संदेश देत आहे. येणाऱ्या ५ वर्षांत या ग्रुपला आवश्यक त्या सर्व सुविधा, मार्गदर्शन आणि सहकार्य नगर परिषदेच्या वतीने दिले जाईल.” तरुणांनी आणि नागरिकांनी या मोहिमेतून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
पोलीस निरीक्षक किशोर पर्वते म्हणाले, “सायकलिंग संडे ग्रुपने गोंदियाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उपक्रमातून शिस्त आणि सुदृढ आरोग्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहे.” पत्रकार भोला गुप्ता यांनी “जेव्हा जेव्हा सायकलस्वार डोंगरगड वारीसाठी निघतील, तेव्हा आमगावमध्ये त्यांचे भव्य स्वागत केले जाईल,” असे आश्वासन दिले.
प्रास्ताविक सायकलिंग संडे ग्रुपच्या अध्यक्षा मंजू कटरे यांनी केले, तर आभार सचिव रवी सपाटे यांनी मानले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कोषाध्यक्ष विजय येडे, विजय सोनी, गोपाल रहांगडाले, लीलाधर रहांगडाले यांच्यासह महेश पांडे, संजय मेश्राम, दीपाली वाढई, नलिनी जाधव, संगीता गायधने, मोना निर्वाण, त्रिवेणी उके, तन्वी खापेकर आणि अनेक सायकल प्रेमींनी परिश्रम घेतले.



