
गडचिरोली : कृषि व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत “किसान चौपाल” थेट प्रक्षेपण कार्यक्रम ७ डिसेंबर रोजी कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली, येथे आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत नुकतेच नविन संशोधीत केलेल्या विविध पिकांचे एकूण १०९ वाणांचे सविस्तर थेट प्रक्षेपणाव्दारे कृषि व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्याव्दारे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत विकसित झालेले नवनविन तंत्रज्ञान, नविन पिकांचे वाण व शेतकऱ्यांचे येट कृषि तज्ञांशी संवाद साधण्याचे उद्दिष्ट्ये साध्य करण्याकरीता किसान चौपाल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रसंगी डॉ. किशोर झाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली ह्यांनी धान पिकाविषयी सविस्तर चर्चा केली. दरम्यान धान पिकाचे आर्थिक ताळेबंद समजून सांगतेवेळेस त्यामधील निव्वळ खर्च, निव्वळ नफा यावर उहापोह करतांना धान पिकाऐवजी इतर पिकाकडे प्रायोगिक तत्वावर कमी क्षेत्रावर वळण्याचे उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले. यामध्ये धान बांधीत रुंद सरी वरंबा पध्दतीने जर तुर या पिकाची लागवड केल्यास नक्कीच धानापेक्षा जास्त निव्वळ नफा मिळेल. आणि याकडे शेतकरी बंधुंनी वळावे असे आवाहन केले. त्याचप्रमाणे शेतामध्ये आगपेटी बंद कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले. व धान पिकाचे तणीस बांधीमध्ये न जाळता ते तणीस शेतकऱ्यांनी आवश्यक तेवढे जनावरांच्या चाऱ्यासाठी किंवा इतर कामासाठी वापरावे आणि उरलेले तणीस त्याच बांधीमध्ये पसरवून त्यावर ४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ४५ किलो युरीया प्रति एकरी एकत्र करून त्या तणसावर एक समान टाकून लगेच जमिन नागरून तणीस जमिनीमध्ये गाडावे. पुढील हंगामाची पेरणी करेपर्यंत संपुर्ण तणसाचे उत्तम प्रकारचे सेंद्रीय खत तयार होऊन जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होते आणि तणीस जाळल्यामुळे होणारे प्रदुषणही टाळता येते असे सर्व शेतकरी बंधु-भगिनींनी करण्याचे आवाहन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथील विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) पुष्पक ए. बोथीकर, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) डॉ. विक्रम एस. कदम, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या) डॉ. प्रितम एन. चिरडे, विषय विशेषज्ञ (कृषि हवामानशास्त्र) नरेश पी. बुध्देवार तसेच शेतकरी बंधु-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे आभार डॉ. प्रितम एन. चिरडे यांनी मानले.



