
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणोती निंबोरकर (भांडेकर) यांचा युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ज्ञान आणि आरोग्य‘ उपक्रम
गडचिरोली : गडचिरोली शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भरीव बदलाची ग्वाही देत, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांनी आज शहरातील प्रत्येक प्रभागात सुसज्ज वाचनालय आणि आधुनिक जिम (व्यायामशाळा) उभारण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प जाहीर केला आहे. या घोषणेद्वारे त्यांनी युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नवा ऊर्जापूर्ण दृष्टीकोन मांडला आहे.
प्रणोती निंबोरकर यांनी आपल्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितले, “गडचिरोलीच्या प्रत्येक नागरिकाला ज्ञान, आरोग्य व प्रगतीची समान संधी देणे हे माझे ध्येय आहे. प्रत्येक प्रभागात उत्तम वाचनालय आणि आधुनिक उपकरणांनी सुसज्ज जिम स्थापन करून आम्ही शिक्षण, संस्कार आणि फिटनेसला नवी दिशा देऊ.”
वाचनालयांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरक वातावरण मिळेल आणि स्पर्धा परीक्षांची तयारी अधिक प्रभावी होईल. यामुळे शहरात वाचनसंस्कृतीचा नवा उन्मेष निर्माण होईल. आधुनिक व्यायामशाळांमुळे युवक व महिलांसह सर्व वयोगटातील नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारता येईल.
शहराच्या विकासाला नवा वेग देण्यासाठी ही योजना निर्णायक ठरेल, असा सकारात्मक प्रतिसाद जनतेतून उमटत आहे. गडचिरोलीला ज्ञान, संस्कार आणि आरोग्याने समृद्ध करण्याचा संकल्प करत प्रणोती निंबोरकर मतदारांच्या न्यायालयात उभ्या आहेत.



