
वाहनांचा चक्काचूर, गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत उपचार
तुमसर : तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील खापा परिसरामध्ये शनिवारी सायंकाळी ४:२० वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण तिहेरी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये कार, पिकअप आणि ट्रॅक्टर या तीन वाहनांची आपसात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात चारजण गंभीर जखमी झाले असून वाहनांचा अक्षरशः चंदामेंदा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरवरून बालाघाटकडे जात असलेली कार (क्रमांक MH 25 BH 2354) आणि तुमसरवरून रामटेकच्या दिशेने येत असलेले पिकअप वाहन (क्रमांक MH 28 AB 3097) यांच्यात समोरून येणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात खापा परिसराजवळ अचानक नियंत्रण सुटले. याच दरम्यान खापा गावातून गिट्टी (खडी) भरून निघालेल्या ट्रॅक्टरलाही (क्रमांक MH 35 AW 3821) या दोन्ही वाहनांची जोरदार धडक बसली.
अपघात एवढा भयानक होता की, कार आणि पिकअपच्या दर्शनी भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. तसेच ट्रॅक्टरचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तिन्ही वाहने एकमेकांवर आदळल्यामुळे झालेल्या मोठ्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. जखमींमध्ये कारचालक विक्रांत गंगाप्रसाद सरनागत (वय ३६, रा. झानेवाडा, बालाघाट), निवांत बेनीसिंग पारधी (रा. खापा, बालाघाट), ट्रॅक्टर चालक प्रकाश फुलसुंगे (रा. बांधटोला) व ओमकार संजय काटेवार (वय २७, रा. कन्हान) यांचा समावेश आहे.
अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. गावातील तरुण रामदास बडवाईक, नाना ठवकर, रोशन मने आणि सागर धोत्रे यांनी इतर गावकऱ्यांच्या मदतीने जीवाची बाजी लावून अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले.
घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक कोंडी सुरळीत करून पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. तुमसरचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण सय्याम आणि बीट जमादार गणेश मन्नाडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



