गडचिरोलीविदर्भ

कठाणी नदी स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे नगराध्यक्षांचे लक्ष ; तातडीने सोयी-सुविधा पुरविण्याचे निर्देश

नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांनी केली प्रत्यक्ष पाहणी; अस्वच्छतेवरून कर्मचाऱ्यांना फटकारले

गडचिरोली : शहरातील आरमोरी रोडवरील कठाणी नदी परिसरात असलेल्या स्मशानभूमीची गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेली दुरवस्था पाहून नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर आणि नगरसेवक सागर निंबोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या स्मशानभूमीची संयुक्तपणे प्रत्यक्ष पाहणी करून, येथील अस्वच्छता आणि अपुऱ्या सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना आता कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

पाहणी दरम्यान स्मशानभूमीत पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नसणे, शौचालयांची दुरवस्था आणि अंत्यविधीसाठी लागणाऱ्या मूलभूत साधनांचा अभाव असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या गंभीर बाबींकडे लक्ष वेधत नगराध्यक्षांनी संताप व्यक्त केला. “नागरिकांच्या दुःखाच्या क्षणी त्यांना किमान मूलभूत सोयी पुरविणे ही नगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. येथील दुर्लक्ष यापुढे खपवून घेतले जाणार नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी प्रशासनाला सुनावले.

स्मशान घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर पसरलेली माती, जागोजागी साचलेला कचरा आणि घाणीचे साम्राज्य पाहून नगराध्यक्षांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना तात्काळ स्वच्छता करण्याचे सक्त आदेश दिले. परिसर केवळ आजच नाही, तर यापुढे कायम स्वच्छ आणि सुरक्षित राहावा यासाठी नियमित देखरेख आणि जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

या पाहणी दौऱ्यात नगर परिषदेचे मुख्याधिकारी पिंदुरकर, जे. ई. खामनकर यांच्यासह नगर परिषदेचे इतर वरिष्ठ कर्मचारी उपस्थित होते. नगरसेवक सागर निंबोरकर यांनी यावेळी स्पष्ट केले की, स्मशानभूमीतील सर्व प्रलंबित कामे प्राधान्याने, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याकडे आमचा कल राहील.

दीर्घकाळापासून नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे कठाणी नदी स्मशानभूमी सुविधांच्या विळख्यात अडकली होती. मात्र, आता स्वतः नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष पाहणी केल्याने, येत्या काही दिवसांत येथे सकारात्मक आणि ठोस बदल घडतील, अशी आशा गडचिरोलीकर व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button