
गडचिरोली : अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सोमवारी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात शेतकरी आणि जनतेच्या विविध महत्त्वाच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. भर उन्हात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेले मागण्यांचे निवेदन सादर केले. उपजिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
रेल्वे बाधित शेतकऱ्यांच्या रेल्वे प्रकल्पात गेलेल्या जमिनींची फेरमोजणी करून त्यांना योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी. गडचिरोली विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करण्यात येऊ नये. रानटी हत्ती आणि वाघांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा. जिव्हानी किंवा जखमी झालेल्या लोकांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी. नुकसान झालेल्या पिकांची भरपाई त्वरित देण्यात यावी. शेतकऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता त्वरित देण्यात यावा. पीक विम्याचे पैसे त्वरित देण्यात यावेत. पशुवैद्यकीय दवाखान्यात पुरेसे डॉक्टर आणि कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत. समाज कल्याण विभागाचा इतरत्र वळवलेला निधी परत करून तो मागासवर्गीयांच्या कामांसाठी खर्च करण्यात यावा. इद्यादी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.
रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत आणि जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश दुधे, प्रदेश सचिव केशवराव साम्रुतवार, गडचिरोली विधानसभा प्रभारी प्रदीप भैसारे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक आघाडी अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, शहरप्रमुख अनिल बारसागडे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेव वासनिक, दादाजी धाकडे आणि इतर कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.



