
९ जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी
भंडारा : परीक्षेत गुण वाढवून देण्याच्या मोबदल्यात विद्यार्थिनींकडून शारीरिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्राचार्य किरण मुरकुट याची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याची पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती, मात्र ती फेटाळून ९ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
भंडारा शहरातील शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयात एएनएमच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत हा प्रकार घडला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधीनस्त असलेल्या या महाविद्यालयात किरण मुरकुट मागील दोन वर्षांपासून प्राचार्य पदावर कार्यरत आहे. या काळात त्याच्या वर्तनाबद्दल विद्यार्थिनींमध्ये चर्चा सुरू असतानाच हे प्रकरण पुढे आले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर शुक्रवारी दुपारी त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर दुपारी ३ वाजता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी हिंगणघाटे यांच्या न्यायालयात हजर केले. पोलिसांनी तपासासाठी या प्राचार्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र, मोबाइल जप्तीसह अन्य सोपस्कार व पार पाडल्यामुळे न्यायालयाने पोलिसांची ही मागणी फेटाळून ९ जानेवारी २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.
भंडारा शहरचे ठाणेदार गोकुल सूर्यवंशी सध्या रजेवर असून, पोलिस निरीक्षक शेवाळे यांच्याकडे सध्या प्रभार आहे. त्यांनी या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक गौरी उईके यांच्याकडे सोपविला आहे. तपासकर्त्या पोलिसांनी प्राचार्य किरण मुरकुट याच्याकडून मोबाइल ताब्यात घेऊन जप्त केला आहे. पुढील तपासाच्या दृष्टीने तो सायबर तज्ज्ञांकडे दिला जाणार आहे.



