गोंदियाविदर्भ

‘स्त्रियांच्या हाकेला महिला आयोगाची साद’; गोंदियात सर्वाधिक कौटुंबिक प्रकरणे निकाली

‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद; समुपदेशनाने अनेक प्रकरणे मिटली

गोंदिया : महिलांच्या समस्या थेट त्यांच्या दारी जाऊन सोडवण्यासाठी राज्य महिला आयोगाने सुरू केलेल्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाला गोंदिया जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमातून अनेक वर्षांपासून दबलेल्या समस्यांना वाचा फुटली असून, विशेषतः कौटुंबिक वादांवर समुपदेशनाने तोडगा काढण्यात यश आले आहे. महिला आयोगाचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने ‘समतेची मोहीम’ ठरत असल्याचे दिसून येत आहे.

गोंदिया जिल्ह्यातील सुनावणीदरम्यान असे दिसून आले की, बहुतांश प्रकरणे ही पती-पत्नीमधील गैरसमजांमुळे उद्भवलेली आहेत. विशेष म्हणजे, तक्रार करणाऱ्या महिलांना आजही त्यांच्या पतीसोबत संसार करण्याची इच्छा असल्याचे आयोगासमोर सांगितले. यावरून असे स्पष्ट होते की, भारतीय महिला लग्न झाल्यावर आपला संसार टिकवण्यासाठी किती प्रयत्नशील असतात. महिला आयोगाने अशा प्रकरणांवर समुपदेशनाने तोडगा काढण्यावर भर दिला, ज्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये पुन्हा सलोखा निर्माण झाला.

काही प्रकरणे सोडवण्यासाठी न्यायालयीन मार्गाचा अवलंब कसा करता येईल, याची माहितीही आयोगाने जागेवरच दिली. यामुळे महिलांना न्याय मिळवण्यासाठी योग्य दिशा मिळाली.

अनेकदा महिलांना त्यांच्या समस्या घेऊन घराबाहेर पडणे शक्य नसते. मात्र, ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमामुळे त्यांना धैर्य मिळाले आणि त्या थेट आयोगासमोर आपला त्रास मांडू शकल्या. एका खुल्या मंचावर आपल्या पुरुषांच्या चुका सांगत त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करताना या महिला खऱ्या अर्थाने सावित्रीचे रूप धारण करत आहेत, असे म्हणता येईल.

आयोगाने निकाली काढलेल्या प्रकरणांचा काही काळ पाठपुरावा केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे, जेणेकरून कुटुंबातील सौख्य कायम राहील. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

मदतीसाठी महत्त्वाचे हेल्पलाइन क्रमांक

महिलांना कोणत्याही परिस्थितीत मदत मिळावी यासाठी हेल्पलाइन नंबर नेहमीच उपलब्ध आहेत: सखी वन स्टॉप सेंटर: १८१, सायबर सुरक्षा: १९३०, चाईल्ड लाईन: १०९८, ज्येष्ठ नागरिकांसाठी: १४५६७, मोफत कायदेशीर सल्ला: १५१००, पोलिसांची महिलांसाठी मदत (२४/७): १०९१, ११२, ९७७७७७७८९०, ८६५७२२२७७७.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button