क्रीडागडचिरोलीविदर्भ

माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू चेतन शर्मा आणि प्रशांत वैद्य करणार प्रतिभावान गोलंदाजांची निवड

विदर्भ क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘बॉलर की खोज’ निवड चाचणी ; जिल्ह्यातील उदयोन्मुख गोलंदाजांना मिळणार सुवर्णसंधी

गडचिरोली : जिल्ह्यातील तरुण आणि प्रतिभावान गोलंदाजांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनने (VCA) एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘विदर्भ प्रीमिअर लीग’च्या दुसऱ्या हंगामासाठी ‘बॉलर की खोज’ हा विशेष उपक्रम राबविला जात असून, यासाठी माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू चेतन शर्मा आणि प्रशांत वैद्य ९ मे रोजी गडचिरोलीत येत आहेत.

शनिवार, ९ मे रोजी शहरातील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर ही निवड चाचणी पार पडणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वेगवान आणि फिरकी गोलंदाजांच्या प्रतिभेला वाव देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यावेळी निवड समितीचे सदस्य विकास गवते, विवेक नायडू आणि सुधीर वानखेडे हे देखील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

या चाचणी दरम्यान निवडल्या जाणाऱ्या गोलंदाजांना नागपूर येथील प्रगत प्रशिक्षण शिबिरासाठी (Advanced Training Camp) आमंत्रित केले जाईल. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गोलंदाजांना त्यांच्यातील तांत्रिक त्रुटी दूर करून कौशल्य विकसित करण्याची ही मोठी संधी असणार आहे.

विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे जिल्हा संयोजक मंगेश देशमुख यांनी जिल्ह्यातील खेळाडूंना या चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सहभागासाठी वयोगट खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे: पुरुष गोलंदाज: १६ ते २५ वयोगट. महिला गोलंदाज: १५ ते २३ वयोगट. जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण आणि महिला गोलंदाजांनी या चाचणीच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे गडचिरोलीच्या क्रीडा क्षेत्रात नवे चैतन्य निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button