
गडचिरोली : जिल्हा मुख्यालय खरपुंडी येथील एका अवैध दारूविक्रेत्याने गावाची शांतता धोक्यात आणल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ‘दारूबंदी गाव संघटना, खरपुंडी’च्या वतीने गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रार अर्जानुसार, गेल्या महिन्यात पोलीस विभागाने खरपुंडी परिसरात धडक कारवाई करून अवैध दारूविक्री बंद केली होती. मात्र, एक विक्रेता अद्यापही लपून-छपून दारूची विक्री करत आहे. जेव्हा दारूबंदी संघटनेच्या महिला गावात गस्त घालतात, तेव्हा संबंधित विक्रेता त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करतो आणि धमकावतो. या अवैध दारू विक्रीमुळे गावातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विक्रेत्यावर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या महिलांनी केली आहे. गडचिरोली पोलिसांनी या अर्जाची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.



