
आरमोरी येथील घटना ; आरोपीला अटक
आरमोरी : फेसबुकवर एका अल्पवयीन मुलीची एका अनोळखी तरुणाशी मैत्री झाली. या मैत्रीतून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार केला. ही खळबळजनक घटना ३ नोव्हेंबरला येथे उघडकीस आली. पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आरोपीला बेड्या ठोकल्या.
सुजित कैलास गेडाम (२२, रा. मोहाडी ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलीसोबत सुजित गेडामची पाच महिन्यांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये चॅटींग सुरु झाले. यातून दोघांत प्रेम बहरले. दरम्यान, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुजितने मुलीला आपल्या गावी भेटण्यास बोलावले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान, नंतर ती गावी परतली. तिने याबाबत कुटुंबीयास सांगितल्यावर आरमोरी ठाण्यात भारतीय न्याय संहिता ६४(१), ६४ (२) (i), ६४(२) (२)८७, १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरमोरी पोलिसांनी ३१ ऑक्टोबरला आरोपीस त्याच्या गावातून ताब्यात घेतले. त्यास न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पो.नि. कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप मोहुर्ले तपास करीत आहेत.



