
जवाहरनगर जवळील खरबी येथील घटना ; बोलेरो पिकअप दुभाजकावर आदळून उलटली
भंडारा : शहापूरहून नागपूरच्या दिशेने मिरची तोडणीसाठी मजूर घेऊन जाणाऱ्या एका भरधाव बोलेरो पिकअपचा भीषण अपघात सोमवारी सकाळी १०:४५ वाजताच्या सुमारास खरबी येथे घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गावरील दुभाजकाला (डिव्हायडर) धडकून उलटले. या अपघातात १९ महिला मजूर जखमी झाल्या असून, त्यापैकी ७ जणींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो पिकअप (क्रमांक एमएच ४० – डीसी १९८१) गोपीवाडा आणि शहापूर येथील महिला मजुरांना घेऊन मिरची तोडणीच्या कामासाठी नागपूरकडे जात होती. खरबी (नाका) सुपर रोडजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन जोराने दुभाजकावर आदळले. धडक इतकी भीषण होती की वाहन महामार्गावरच उलटले. यामुळे वाहनात बसलेल्या महिला मजूर रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि सर्वत्र किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या.
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलांना तातडीने उपचारासाठी शहापूर येथील आयुष्यमान आरोग्यवर्धिनी केंद्र आणि जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे दाखल करण्यात आले. शहापूर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर काही मजुरांना घरी सोडण्यात आले आहे.
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये गोपीवाडा येथील शारदा ठवकर (३०), जसूदा गोंधुळे (७०), सुनीता सपाटे (६५), शारदा मेश्राम (३५), शीला वैद्य (६५), बेबीबाई श्रीरंगे (५७), विद्या टांगले (३७), वच्छला मारबते (३५), शीला धोत्रे (३२), सुमत्रा धोत्रे (७०), सिंधू वैद्य (६५), रेखा गेडाम (४७), कांता तिजारे (६५), लता तिजारे (५०), शीला बोंदरे (४०), शिल्पा बोंद्रे (४०) आणि शहापूर येथील सुनीता तिजारे (५५), रीना हरगुडे (३५), शांता भोंदे (६०) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी अनिता इंद्रेश्वर धोत्रे (रा. गोपीवाडा) यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी मोहदुरा येथील वाहन चालक लिचडे याच्याविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.



