गडचिरोलीविदर्भ

पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली; हेमलकसा-लाहेरी मार्ग बंद

दरवर्षीची समस्या कायम; नवीन पुलाच्या कामातील दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये संताप

गडचिरोली : गेल्या दोन दिवसांपासून भामरागड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३० डी वरील भामरागड-पर्लकोट दरम्यानचा पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. यामुळे २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून हेमलकसा-लाहेरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी ही समस्या उद्भवते, ज्यामुळे या मार्गावरील नागरिकांचे प्रचंड हाल होतात. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच व्यापारी वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे. रस्त्यालगतच्या गावांमध्ये जाण्यासाठी प्रवाशांना लांबच्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याने प्रवासाचा कालावधी आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

या पुलाशेजारी नवीन पुलाचे बांधकाम मागील चार वर्षांपासून सुरू आहे, परंतु कामाची गती अत्यंत मंद असल्याने ते अजूनही पूर्ण झालेले नाही. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कामातील विलंब आणि निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेमलकसा-लाहेरी हा मार्ग आरोग्य, शिक्षण, शेतीमालाची वाहतूक तसेच माओवादी प्रभावित भागातील शासकीय कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन नवीन पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button