
मासिक पाळी हे स्त्रीला मिळालेले वरदान, संकोच न बाळगता आरोग्याची काळजी घेण्याचे डॉ. विजयालक्ष्मी रहांगडाले यांचे आवाहन
गोंदिया : बालपण संपून तारुण्याकडे पाऊल पडत असताना १० ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या शरीरात आणि मनात अनेक बदल होत असतात. या नाजूक टप्प्यावर त्यांना योग्य दिशा मिळावी, यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात ‘मैत्री क्लिनिक’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून तालुक्यातील प्रोग्रेशिव स्कूल, चुलुद येथे विशेष समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयालक्ष्मी रहांगडाले यांनी किशोरवयीन मुलींशी संवाद साधला. “मासिक पाळी ही मातृत्वाची पहिली पायरी असून तिची भीती बाळगण्याचे किंवा विटाळ पाळण्याचे कोणतेही कारण नाही. उलट हे निसर्गाचे एक वरदान आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. या काळात आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून सॅनिटरी नॅपकिनचा वापर, स्वच्छता आणि पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.
केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्य जपण्यासाठी डॉ. कांचन भोयर यांनी विद्यार्थिनींना योगाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवून तणावमुक्त राहण्याचे धडे दिले. निधी मिश्रा यांनी प्राथमिक प्रतिबंधात्मक उपाययोजनेची माहिती दिली, तर ‘अर्श’ (ARSH) कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक सपना ठाकरे यांनी ‘मैत्री क्लिनिक’च्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला.
गोपनीयता: किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्व समस्या आणि माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. मोफत सुविधा: समुपदेशन, वैद्यकीय तपासणी आणि उपचार पूर्णतः मोफत दिले जातात. शास्त्रीय दृष्टिकोन: शारीरिक, मानसिक, भावनिक आणि लैंगिक बदलांबाबत तज्ज्ञांद्वारे शास्त्रीय माहिती दिली जाते. हि मैत्री क्लिनिकची वैशिष्ट्ये आहेत.
शाळेतील सर्व किशोरवयीन विद्यार्थिनींनी या सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वाढत्या वयातील शंकांचे निरसन झाल्यामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण पाहायला मिळाले.



