‘सत्तेत अजित पवार चालतात, निवडणुकीत सेक्युलर मतांच्या विभाजनासाठी ‘दादां’ना स्वतंत्र लढवणार’ : विजय वडेट्टीवार यांची महायुतीवर सडकून टीका

मुंबई : राज्यातील होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना युतीत असेल, पण अजित पवार यांचा पक्ष नसेल, ही महायुतीची पूर्वनियोजित रणनीती आहे. सत्तेचा मलिदा खाताना अजित पवार चालतात, पण निवडणुकीत काँग्रेसच्या सेक्युलर मतांचे विभाजन करण्यासाठी त्यांना स्वतंत्र लढण्यास भाग पाडले जाईल, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी महायुतीच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री करायचे, त्यांच्यासोबत चहा-नाष्टा करायचा आणि निवडणूक आली की नवाब मलिक यांचा मुद्दा पुढे करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला युतीपासून दूर ठेवायचे, हा दुटप्पीपणा आहे.”
वडेट्टीवार यांनी आरोप केला की, निवडणुकीत मतांचे विभाजन करून भाजपला फायदा व्हावा, यासाठी अजित पवार यांना स्वतंत्र निवडणूक लढवण्यास लावले जाईल. निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जवळ करायचे आणि मतांचे विभाजन करायचे, हे महायुतीचे राजकारण आता लपून राहिलेले नाही. “हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद निर्माण केल्याशिवाय भाजप निवडणुका जिंकू शकत नाही, म्हणूनच निवडणुका आल्या की हा वाद निर्माण केला जातो,” असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
महापालिका निवडणुकांची घोषणा झाली असतानाही वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीला घेरले. “स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले, असे भाजप वारंवार सांगत होती. आता महापालिका निवडणुका घोषित झाल्या आहेत. पण उद्या पुन्हा कोर्टात जाऊन ओबीसींच्या जागांवरील निवडणुका रद्द झाल्या आणि त्यांचे प्रतिनिधित्व कमी झाले, तर याची जबाबदारी कोणाची?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, “निवडणुका झाल्या तरी ओबीसींच्या जागांवर टांगती तलवार कायम आहे. त्यांच्या जागांवर वरवंटा फिरणार आहे.”
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतविभाजन टाळावे आणि भाजपला त्याचा फायदा होऊ नये, अशी भूमिका महाविकास आघाडीतील सर्व पक्षांची आहे. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार की नाही, याबाबत स्थानिक नेते आणि पदाधिकारी निर्णय घेतील. स्थानिक नेते तेथील समीकरणे पाहून योग्य निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी येथील शेतकरी शिवदास कुडे याच्या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी या शेतकऱ्याने किडनी विकण्याची तयारी दर्शवत पोलिसांना पत्र लिहिले होते. वडेट्टीवार यांनी हे प्रकरण समजल्यावर संबंधित शेतकऱ्याला मदत केली असून, त्याला न्याय मिळावा यासाठी पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.



