तंत्रज्ञानातून रोजगाराची क्रांती : गोंडवाना विद्यापीठाचे ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर’ ग्रामीण विकासासाठी सरसावले

राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानच्या सहकार्याने ७ कमी खर्चिक तंत्रज्ञानांचे हस्तांतरण ; शेतकरी, युवक व महिलांना मिळणार बळ
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योजकता विकसित करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या ‘विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राने’ (STRC) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान (NIF), भारत यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील शेतकरी, युवक आणि महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आणि कमी खर्चिक अशा ७ विविध तंत्रज्ञानांवर आधारित उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन STRC ने ७ तंत्रज्ञानांचे प्रस्ताव राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानकडे सादर केले होते. या प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून, आता हे तंत्रज्ञान अधिकृतरीत्या STRC कडे हस्तांतरित करण्यात आले आहे. यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना गावातच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या उपक्रमांतर्गत दोन महत्त्वाच्या तंत्रज्ञानांची प्रत्यक्ष क्षेत्रात चाचणी आणि प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे: मल्टी ट्री क्लायंबर (झाडावर चढण्याचे यंत्र): धानोरा तालुक्यातील कोंदावाही येथे याचे प्रात्यक्षिक झाले. कोयंबतूर येथील नवोन्मेषक श्रीवर्धन यांनी स्वतः उपस्थित राहून ताडी/ताड काढणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना याचे प्रशिक्षण दिले. यामुळे उंच झाडावर चढणे आता सोपे आणि सुरक्षित होणार आहे. मल्टीफूड प्रोसेसिंग युनिट: STRC परिसरात विविध फळांपासून ज्यूस, जॅम, जेली, केचप, साबण व जेल तयार करण्याचे प्रशिक्षण महिला आणि युवक समुदायाला देण्यात आले.
येत्या महिन्याभरात आणखी काही क्रांतीकारक यंत्रांचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत, ज्यात कापूस वात बनविण्याचे यंत्र, मल्टी कमोडिटी ग्राइंडर (विविध धान्य दळण्यासाठी), पानांपासून ताटे व वाट्या बनविण्याचे यंत्र, मका सोलण्याचे आणि बांबू पट्टी व रॉड बनविण्याचे यंत्र यांचा समावेश असेल.
या उपक्रमामुळे रोजगार निर्मिती: ग्रामीण भागात लघुउद्योगांना चालना मिळेल. महिला सक्षमीकरण: महिलांना घरातूनच प्रक्रिया उद्योग सुरू करता येतील. बचत: शेती उत्पादनातील वेळ आणि मजुरीच्या खर्चात मोठी बचत होईल. गुणवत्ता: स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाची उत्पादने तयार होऊन त्यांना बाजारपेठ मिळेल.
सदर उपक्रम गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात आहे. STRC चे मुख्य कार्यक्रम अधिकारी स्वप्निल गिराडे आणि त्यांच्या वैज्ञानिक अधिकाऱ्यांची चमू या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहे.



