आत्महत्येसाठी गेलेल्या महिलेचा पोलिसांनी वाचविला जीव

समुपदेशन करून महिलेला कुटुंबाकडे सोपविले
चंद्रपूर : एक महिला आत्महत्या करण्यासाठी रामाळा तलाव येथे फिरत असल्याची माहिती डायल ११२ वरून शहर पोलिसांना मिळाली. शहर पोलिसांच्या पथकाने लगेच घटनास्थळ गाठून त्या महिलेचे प्राण वाचवले. तसेच त्या महिलेला तिच्या पती व कुटुंबीयाच्या स्वाधीन करण्यात आले. शहर पोलिसांच्या या कारवाईने त्यांचे
सर्वत्र कौतुक होत आहे. २५ सप्टेंबर रोजी शहर पोलिस स्टेशनमधील डायल ११२ वरील कर्मचारी रमाकांत कांबळी यांना रामाळा तलाव येथे एक महिला स्वतःच्या जिवाचे बरेवाईट करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना माहिती देण्यात आली. त्यांनी लगेच डीओ ड्यूटीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक कपिल गुघे यांच्यासह ११२ चे पोलिस हवालदार रमाकांत कांबळी, नवनीत सोनुले, मपोअ कृती उराडे यांची चमू रामाळा तलाव परिसरात पाठवली.
दरम्यान एक महिला रामाळा तलावात उडी मारण्याच्या तयारीत दिसली. पोलिसांनी महिलेला वेळीच पकडून काठावर आणले. तिची आपुलकीने चौकशी केली. तिचे समुदेशन करून तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. तिची वैद्यकीय तपासणी करून कुटुंबीयांना माहिती दिली. ते आल्यानंतर त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. चंद्रपूर शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



