गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

गडचिरोलीतील दोन प्रमुख महामार्ग जड वाहतुकीसाठी बंद

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

गडचिरोली : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघात आणि राष्ट्रीय महामार्गांवरील अपूर्ण कामांमुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेता, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी दोन प्रमुख मार्गांवरील वाहतुकीसंदर्भात महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.

सिरोंचा ते आलापल्ली मार्ग ५ जूनपासून बंद

राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३-C वरील सिरोंचा ते आलापल्ली या मार्गावर मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वर्दळ असते. मात्र, हा रस्ता पावसाळ्यात जड वाहतुकीसाठी पूर्णतः अयोग्य असल्याने, येत्या ५ जूनच्या मध्यरात्रीपासून ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हा मार्ग सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग: या कालावधीत सिरोंचा ते आलापल्ली मार्गावरील जड वाहनांनी मंचेरियाल–राजुरा–बल्लारशाह–चंद्रपूर–गडचिरोली या पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच, आलापल्लीहून मंचेरियालकडे जाण्यासाठी आष्टी–बल्लारपूर–मंचेरियाल या पर्यायी मार्गाचा वापर करता येईल.

आपत्कालीन सेवा देणारी वाहने, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, पोलीस, अन्न व औषध पुरवठा, महावितरण, दूरसंचार, रस्ते दुरुस्ती आणि प्रवासी सेवा देणारी वाहने या बंदी आदेशातून वगळण्यात आली आहेत.

कुरखेडा ते कोरची मार्गावरही बदल

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४३ वरील कुरखेडा ते कोरची मार्गावर सती नदीवरील पूरबुडीत जुन्या पुलाजवळ नवीन मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. सध्या वाहतुकीसाठी वळण रस्त्याचा वापर केला जात आहे. परंतु, पावसाळ्यात हा वळण मार्ग पाण्याखाली जाऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे दिनांक ४ जून २०२५ च्या मध्यरात्रीपासून ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कुरखेडा–कोरची मार्गावरील वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत.

पर्यायी मार्ग: हलकी वाहने: कुरखेडा-आंधळी फाटा-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा आणि कुरखेडा-तळेगाव-खेडेगाव-अंतरगाव-पुराडा या मार्गांचा वापर करू शकतात. जड वाहने: कुरखेडा–वडसा–आरमोरी–वैरागड–गोठणगाव फाटा या मार्गाचा वापर करतील.

या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित तहसीलदार, पोलीस विभाग, परिवहन विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना आवश्यक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेत मार्गदर्शक फलक लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. वाहतूक नियमनासाठी पोलीस विभाग आवश्यक मनुष्यबळ व बॅरिकेडिंगची व्यवस्था करेल. संबंधित तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी आठवड्याला संयुक्त अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.

मोटार वाहन कायदा १९८८, भारतीय दंडसंहिता १८६०, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत या आदेशांचे पालन करणे बंधनकारक असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

जिल्हा प्रशासनाने वाहतूकदार, वाहनचालक तसेच नागरिकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button