
माजी आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते उद्घाटन ; तरुणांमध्ये शिस्त, संघभावना वाढवण्यावर भर
देसाईगंज : तालुक्यातील कोरेगाव येथील सार्वजनिक राजे क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य डे-नाईट टेनिस बॉल शॉर्टपिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते फित कापून या स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.
माजी आमदार कृष्णा गजबे यांनी यावेळी खेळाडू व ग्रामस्थांना संबोधित करताना, गावपातळीवरील क्रीडा उपक्रमांचे महत्त्व विशद केले. गजबे म्हणाले, “गावपातळीवरील क्रीडा उपक्रम हे तरुणांमध्ये शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास वाढविण्याचे माध्यम आहेत. क्रीडा ही फक्त खेळ राहात नाही, तर समाजाला एकत्र ठेवण्याची शक्ती ठरते. सार्वजनिक राजे क्रीडा मंडळाने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, यामुळे ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमींना व्यासपीठ प्राप्त झाले आहे.”
उद्घाटन झाल्यानंतर कृष्णा गजबे यांनी स्वतः मैदानात उतरून बॅट घेऊन टेनिस बॉल क्रिकेटचा आनंद घेतला आणि खेळाडूंशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवले. या रोमांचक स्पर्धेचे आयोजन १६ नोव्हेंबर पासून यशवंत तुळशिरामजी मस्के यांच्या भव्य पटांगणावर करण्यात आले आहे. अंतिम सामन्यापर्यंत येथे सामने खेळवले जाणार आहेत. कोरेगाव आणि परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत कमालीचा उत्साह आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठाणी, भाजपा तालुका अध्यक्ष सुनिल पारधी, माजी सभापती मोहन गायकवाड, माजी उपसभापती गोपाल उईके, प्रभारी सरपंच धनंजय तिरपुडे (कोरेगाव), सामाजिक कार्यकर्ता चेतन मस्के यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



