
‘जातीय सलोखा व लोकशाही संरक्षण’ या विषयावर विचारमंथन
आरमोरी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आरमोरी येथे आरक्षणाचे जनक, बहुजन उद्धारक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५६वी जयंती ‘जातीय सलोखा व लोकशाही संरक्षण’ या विषयावर विचारमंथन करून उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयकुमार मेश्राम होते, तर विशेष अतिथी म्हणून धर्मानंद मेश्राम, राज बन्सोड, ॲड. सोनाली मेश्राम, राजू सातपुते, डॉ. धर्मराज सोरदे, विठ्ठल प्रधान, लकी पाटील, सतीश दुर्गमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी करवीर संस्थानचे राजे आणि बहुजन उद्धारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीतील प्रसंगांचे वर्णन केले. राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी व आर्थिक क्षेत्रात केलेल्या दैदिप्यमान कामगिरीला तोड नाही, असे भाष्य करत ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला.
तसेच, सध्याच्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी जातीय व धार्मिक संघर्ष न करता शिक्षण व उद्योग जगतातील घडामोडींवर विशेष भर देण्याचे आवाहन करण्यात आले. दूरदृष्टीकोन ठेवून समाजाची प्रगती साधावी लागेल, यातूनच राजर्षी शाहूंना अपेक्षित असलेले राष्ट्र घडेल, असा संदेश यावेळी देण्यात आला.
प्रास्ताविकात माकपचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांनी मार्क्सवादी पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाची वाटचाल आणि भविष्यात येणाऱ्या धोक्याची सूचना यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रितेश अंबादे यांनी केले, तर आभार विठ्ठल प्रधान यांनी मानले.
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यावर अढळ निष्ठा असलेले स्त्री, पुरुष, युवा, कार्यकर्ते व मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाची सांगता सहभोजनाने झाली.



