
जनक नगर येथील मंदिरात २२ नोव्हेंबर रोजी मुख्य उत्सव ; १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल
गोंदिया : संपूर्ण जगात लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या शतकोत्तर (१०० वर्षांहून अधिक) जयंतीचा सोहळा गोंदिया शहरात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. सत्यसाई सेवा समिती, गोंदियातर्फे यावर्षीचा जन्मशताब्दी उत्सव सोहळा अतिशय भव्यदिव्य स्वरूपात २२ नोव्हेंबर रोजी श्री शिर्डी साई श्री सत्यसाई मंदिर, जनक नगर, गोंदिया येथे साजरा केला जाणार आहे.
सत्यसाई बाबांच्या जन्मशताब्दी उत्सवानिमित्त १९ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांसह सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १९ नोव्हेंबर रोजी महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत कर्तव्य बजावणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

२० नोव्हेंबर रोजी श्री पटेल भवन, बापट चाल, रेलटोली येथे भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. २१ नोव्हेंबर रोजी श्री सत्यसाई मंदिरात स्वच्छता अभियान आणि ललिता सहस्त्र पाठ आयोजित करण्यात आले. २३ नोव्हेंबर रोजी जन्मशताब्दी उत्सवानिमित्त महाप्रसाद आणि सायंकाळी ७ वाजता महामंगल आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
समितीचे अध्यक्ष सुशील अग्रवाल यांनी भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या जन्मशताब्दी उत्सवात जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व भक्तांना केले आहे.



