क्रीडागडचिरोलीविदर्भ

गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या विनय कोवेची भारतीय बॉल बॅडमिंटन संघात निवड!

साऊथ एशियन स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणारा जिल्ह्यातील पहिला खेळाडू

गडचिरोली : जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी एक अत्यंत अभिमानाची बातमी आहे. गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा माजी विद्यार्थी तथा जिल्ह्याचा स्टार बॉल बॅडमिंटनपटू विनय कोवे याची आगामी साऊथ एशियन बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. भारतीय बॉल बॅडमिंटन संघात निवड झालेला तो गडचिरोली जिल्ह्यातील प्रथम खेळाडू ठरला आहे.

दिल्ली येथे ७ ते ९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या निवड चाचणी शिबिरात विनय कोवे महाराष्ट्राकडून सहभागी झाला होता. त्याने यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र संघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे.

विनय कोवे म्हणाला, “विद्यालयाच्या शिस्तीने व योग्य मार्गदर्शनानेच मी हे यश प्राप्त करू शकलो. एखाद्या कामाप्रती आपली आवड आणि सातत्य असले की आपण उच्च स्तर सहज गाठू शकतो.” तीनदा राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारल्यानंतर आंतरराष्ट्रीय संघात निवड नक्कीच होईल, याची खात्री होती, असेही त्याने सांगितले. त्याने आपल्या निवडीचे श्रेय विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे व पालकांना दिले.

भारतीय संघात निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने विनय कोवेचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. भगवंतराव मेमोरिअल शिक्षण संस्था अहेरीचे सचिव धर्मरावबाबा आत्राम, प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, क्रीडा प्रमुख भूपेंद्र चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button