गडचिरोलीविदर्भ

‘Invalid BOQ’चा तांत्रिक खेळ; दिना प्रकल्पांतर्गत विश्रामगृह दुरुस्तीची निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात!

कंत्राटदारांना डावलण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही – डॉ. प्रणय खुणे यांचा आक्रमक पवित्रा

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील दिना प्रकल्प अंतर्गत विश्रामगृह दुरुस्तीच्या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत मोठा तांत्रिक घोळ असल्याचा आरोप करत, ही प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने केली आहे. ‘Invalid BOQ’ या तांत्रिक त्रुटीमुळे पात्र कंत्राटदारांना जाणीवपूर्वक प्रक्रियेबाहेर ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केला आहे.

पाटबंधारे विभागामार्फत दिना प्रकल्पातील विश्रामगृह दुरुस्तीसाठी निविदा क्र. २६/२०२६-२७ (टेंडर आयडी: 2026_CEWRN_1295957_1) प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रक्रियेत कंत्राटदार वि. बी. बोम्मावार आणि आर. व्ही. शेट्टे यांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, त्यांच्या खात्यातून ईएमडी (EMD) रक्कम देखील कपात झाली. मात्र, अंतिम टप्प्यात बीओक्यू (BOQ) अपलोड करताना सिस्टीमवर वारंवार ‘Invalid BOQ’ असा संदेश येत होता. यामुळे कंत्राटदारांना आपली निविदा पूर्णपणे सादर करता आली नाही.

तांत्रिक अडथळा आल्यानंतर संबंधित कंत्राटदारांनी तातडीने विभागीय कार्यालयाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, विभागाकडून या तांत्रिक बिघाडाची कोणतीही दखल घेतली गेली नाही. यामुळे ही केवळ तांत्रिक त्रुटी नसून, काही ठराविक कंत्राटदारांना लाभ मिळवून देण्यासाठी आणि इतरांना प्रक्रियेतून बाहेर काढण्यासाठी रचलेला हा पूर्वनियोजित कट असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, गडचिरोली यांना लेखी निवेदन दिले आहे. निविदा प्रक्रियेतील पारदर्शकता संपुष्टात आली असून, ही निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करून ती नव्याने प्रसिद्ध करण्याची मागणी डॉ. प्रणय खुणे यांनी केली आहे.

लोकशाही मार्गाने चालणाऱ्या निविदा प्रक्रियेत अशा प्रकारे तांत्रिक अडथळे निर्माण करून कंत्राटदारांना डावलणे हा अन्याय आहे. प्रशासनाने ही निविदा रद्द करून सर्वांना समान संधी उपलब्ध करून द्यावी, अन्यथा तीव्र संघर्ष छेडला जाईल. असा इशारा डॉ. प्रणय खुणे यांनी दिला आहे.

या मागणीसाठी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानु उपाध्ये, महिला आघाडी अध्यक्ष मनीषा मडावी यांच्यासह स्नेहा मेश्राम, भूषणा खेडेकर, राणी गोपशेट्टीवर, मोरेश्वर भांडेकर, दीपक सातपुते, कालिदास बन्सोड, संतोष बुरांडे, दिनेश मुजुमदार आणि प्रवीण गेडाम यांसह अनेक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. आता या प्रकरणावर पाटबंधारे विभाग काय भूमिका घेते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button