
माजी आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते शुभारंभ ; प्रधानमंत्री मोदी यांचे आभासी मार्गदर्शन
आरमोरी : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), आरमोरी येथे ‘अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम (STEP)’ आणि स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना थेट उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण आणि नवी कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाचा प्रारंभ माजी आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पूजनाने झाला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभासी माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आभासी उपस्थिती होती. विश्वकर्मा लाभार्थी हितेश दहिकर (मुख्य अतिथी), तहसीलदार उषा चौधरी, आणि पोलीस निरीक्षक कैलास गवते हे कार्यक्रमाला उपस्थित होते.
माजी आ. कृष्णा गजबे यांनी सांगितले की, “तंत्रज्ञानाशी जुळलेले कौशल्य विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील रोजगारक्षम बनवेल. शासनाच्या या पुढाकारामुळे गडचिरोली जिल्ह्याचा वेगाने विकास होईल.”
या उपक्रमांतर्गत उद्योग-संरेखित व कौशल्य आधारित अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. याप्रसंगी विद्यार्थी, पदाधिकारी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



