गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना सैनिकी विद्यालयात संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली येथे संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेविरुद्ध कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे तसेच स्वच्छता व मानवतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे होते. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे, प्रा. संदीप कोटांगले व प्रा. गजानन ढोले उपस्थित होते.

यावेळी प्रा. गजानन ढोले यांनी मनोगत व्यक्त करताना संत गाडगे महाराजांचे जीवन हे त्याग, सेवा आणि प्रामाणिकतेचे जिवंत उदाहरण असल्याचे सांगितले. त्यांनी केवळ उपदेश न करता स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छतेचे कार्य केले, असे ते म्हणाले. प्रा. संदीप कोटांगले यांनी “राम गेले, कृष्ण गेले ऐसे कोट्यानुकोटी, काय रडू मी एकासाठी…” या ओळींचा संदर्भ देत जीवनाचे तत्त्वज्ञान स्पष्ट केले. महान व्यक्तीही नश्वर आहेत, त्यामुळे माणसाने दुःखात न अडकता समाजहितासाठी कार्य करावे, हा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी “पित्याने पुत्र नाही शिकविला, तोही पापाचा भागीदार झाला; जैसे जन्म देणे कर्तव्य, तसे शिक्षण देणे अगत्याचे” या कीर्तनातील ओळींच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. संत गाडगे महाराजांनी शिक्षणाला दिलेले प्राधान्य आणि समाजपरिवर्तनातील त्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त भाषणे देऊन संत गाडगे महाराजांच्या विचारांचा जागर केला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक रवींद्र कोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंद चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button