भंडारामुख्य बातमीविदर्भ

वडिलांचे पार्थिव घरात, लेक परीक्षा केंद्रात! ; अश्रूंना आवर घालत जान्हवीने दिला बारावीचा पेपर

तुमसर : नियतीचा क्रूर खेळ एका बाजूला आणि आयुष्याचं ध्येय दुसऱ्या बाजूला… अशा अत्यंत कठीण प्रसंगात तुमसर तालुक्यातील आंबागड येथील जान्हवी हौशीलाल राहांगडाले या विद्यार्थिनीने जे धैर्य दाखवले, ते पाहून संपूर्ण जिल्ह्याचे डोळे पाणावले आहेत. घरात वडिलांचे पार्थिव अंत्यसंस्काराची वाट पाहत असताना, डोळ्यांतील अश्रूंना आवर घालत जान्हवीने बारावी बोर्डाचा इंग्रजीचा पेपर लिहून आपल्या जिद्दीचे दर्शन घडविले.

सोमवारी दुपारी जान्हवीचे वडील हौशीलाल राहांगडाले (५१) सायकलने घरी परतत असताना अचानक तोल जाऊन पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने राहांगडाले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. मंगळवारी सकाळी घरात वडिलांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी ठेवले होते, नातेवाइकांच्या हुंदक्यांनी अंगण भरून गेले होते.

मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी बारावी बोर्डाचा पहिलाच इंग्रजीचा पेपर होता. वडिलांच्या निधनामुळे जान्हवी पूर्णपणे खचली होती, मात्र “शिक्षणातून मोठी हो” हे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने स्वतःला सावरले. मामाच्या मुलासोबत ती तुमसर येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर पोहोचली. केंद्रावर आल्यावर तिची अवस्था पाहून मुख्याध्यापक पंकज बोरकर आणि केंद्र संचालक प्रा. नीलकंठ कापगते यांनी तिला मानसिक आधार दिला. डोळ्यांसमोर वडिलांचा चेहरा तरळत असतानाही तिने धैर्याने हातात पेन धरले आणि तीन तास परीक्षेचा पेपर लिहिला.

दुपारी पेपर संपवून जान्हवी बाहेर आली आणि वडिलांच्या आठवणीने तिला रडू कोसळले. तिथून थेट गावात पोहोचल्यानंतर तिच्या उपस्थितीत वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आंबागड ते तुमसर असा ८ किलोमीटरचा प्रवास दररोज सायकलने करून शिक्षण घेणारी जान्हवी अभ्यासात अत्यंत हुशार आहे. तिच्या या धाडसाबद्दल शिक्षक आणि ग्रामस्थांनी अभिमान व्यक्त केला आहे.

बारावीची परीक्षा माझ्या आयुष्यासाठी महत्त्वाची आहे. बाबांना मला शिकून मोठं झालेलं पाहायचं होतं. त्यांचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी काळजावर दगड ठेवून पेपर द्यायला बसले. असे सांगताना तिचा आवाज दाटून आला. पेपर पूर्ण होताच तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शिक्षणाची ओढ आणि वडिलांप्रती असलेली निष्ठा यांमुळे जान्हवीची ही कहाणी आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button