गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

मरकणार ग्रामस्थांकडून नक्षलवाद्यांना ‘गावबंदी’; भरमार बंदूक पोलिसांना सुपूर्द

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील मरकणार येथील ग्रामस्थांनी ऐतिहासिक निर्णय घेत नक्षलवाद्यांना ‘गावबंदी’ (प्रवेशबंदी) केली आहे. ३० सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत एकमताने हा ठराव पारित करण्यात आला आणि ग्रामस्थांनी विश्वासाचे प्रतीक म्हणून एक भरमार बंदूक देखील अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक यांना सुपूर्द केली.

माओवादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने शासनाच्या ‘नक्षल गावबंदी योजना’ आणि गडचिरोली पोलिसांच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमातून मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या लाभांमुळे नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास वाढला आहे. याच विश्वासाचे फळ म्हणून जानेवारी २०२४ पासून अतिदुर्गम भामरागड उपविभागातील कवंडेसह एकूण ४० गावांनी एकमताने माओवाद्यांना गावबंदी करण्याचा ठराव संमत केला आहे. यामुळे गडचिरोलीतील जनतेचा शासनाप्रती असलेला विश्वास अधिक दृढ झाला आहे.

पोस्टे कोठी हद्दीतील मरकणार हे गाव गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर, माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परिसराजवळ आहे. भूतकाळात या गावावर माओवाद्यांचे मोठे वर्चस्व होते. मात्र, पोलीस दलाने १६ जुलै २०२५ रोजी मरकणार ते अहेरी बससेवा सुरू करणे आणि विविध नागरी कृती उपक्रम राबवल्यामुळे जनतेचा विश्वास वाढला.

९ फेब्रुवारी २०२५ रोजी पहिल्यांदा मरकणारच्या ५५-६० ग्रामस्थांनी गावबंदीचा ठराव पोलिसांना सादर केला होता. काल (३० सप्टेंबर २०२५) आयोजित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ७०-७५ नागरिकांनी एकत्र येऊन एकमताने गावबंदीचा ठराव अंतिम केला आणि तो अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक यांना सुपूर्द केला. यावेळी ग्रामस्थांनी गावातील ०१ भरमार बंदूक पोलिसांना सुपूर्द करून आपण माओवाद्यांविरुद्धच्या लढाईत पोलीस दलाच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचे आश्वासन दिले.

ग्रामसभेदरम्यान अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक यांनी ग्रामस्थांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांनी शासनाच्या विविध योजनांचे महत्त्व पटवून दिले आणि माओवाद्यांच्या दमदाटीला न जुमानण्याचे आवाहन केले. यावर गावकऱ्यांनी माओवाद्यांना जेवण/राशन/पाणी देणार नाही, कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही, गावातील युवक त्यांच्या संघटनेत सहभागी होणार नाहीत, गावात थांबू देणार नाहीत किंवा त्यांच्या मिटींगला जाणार नाही, असे आश्वासन दिले.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी गावबंदीचा ठराव करणाऱ्या मरकणार ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे. नीलोत्पल यांनी अबुझमाड जंगल परिसरातील इतर गावातील नागरिकांना माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता, स्वतःच्या आणि गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे, तसेच गडचिरोली जिल्ह्याला माओवादमुक्त करण्यासाठी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button