गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीचा ‘रजत’ चमकला! ; यूपीएससी परीक्षेत देशात ५१४ वी रँक

नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते सत्कार ; नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

गडचिरोली : अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीच्या मातीतील कर्तृत्वाने पुन्हा एकदा देशाला भुरळ घातली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत रजत वाळके यांनी देशात ५१४ वी रँक मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाने केवळ वाळके कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा अभिमान उंचावला असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

मर्यादित साधनसामग्री आणि ग्रामीण वातावरणात राहून रजत वाळके यांनी हे शिखर सर केले आहे. कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य आणि संकटांवर मात करण्याची जिद्द या बळावर त्यांनी यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत आपली मोहोर उमटवली. “प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्य असल्यास कोणतीही परीक्षा अशक्य नाही,” असा विश्वास रजत यांनी आपल्या यशानंतर व्यक्त केला.

रजत वाळके यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत नगरपरिषद गडचिरोलीच्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी नगरसेवक सागर निंबोरकर आणि नगरपरिषद उपाध्यक्ष निखिल चरडे प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी नगराध्यक्ष निंबोरकर म्हणाल्या, “गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातून यूपीएससीमध्ये यश मिळवणे ही मोठी अभिमानाची बाब आहे. रजत वाळके यांचे यश हे जिल्ह्याच्या तरुणांसाठी आशेचा किरण असून, यामुळे अनेक तरुण मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करतील.”

रजत यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबीयांचे भक्कम पाठबळ आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. दुर्गम भागात राहूनही ध्येय गाठता येते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

रजत वाळके यांच्या यशाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले. भविष्यात ते प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना समाजाच्या आणि विशेषतः गडचिरोलीसारख्या भागाच्या विकासासाठी मोठे योगदान देतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button