
कुरखेडा न्यायालयाने सुनावली १० हजार रुपये दंडाची शिक्षा ; वन्यजीव शिकाऱ्यांसाठी कडक संदेश
कुरखेडा : तालुक्यातील दादापूर राखीव वनक्षेत्रात २०१४ मध्ये बिबट्याच्या पिल्लाची निर्घृण शिकार करून त्याची कातडी व नखे विक्रीसाठी नेणाऱ्या तिघांना कुरखेडा येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायाधीश एन.पी. देशपांडे यांनी आरोपींना वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत तीन वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
हे थरारक प्रकरण १० ऑक्टोबर २०१४ रोजी उघडकीस आले होते. नागपूरच्या गोंदवाना चौकात क्राईम ब्रांचने कारवाई करत आरोपी मोरेश्वर चरणदास आंबाडे याच्याकडून बिबट्याच्या पिल्लाची कातडी आणि पाच नखे जप्त केली होती. तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, आरोपी नलिन काशिनाथ आंबाडे याने ही कातडी आरोपी परशराम झिटारू नरोटे याच्याकडून घेतली होती. परशरामने दादापूर वनक्षेत्रातील कंपार्टमेंट क्र. २४५ मध्ये एका बिबट्याच्या पिल्लावर कुऱ्हाडीने वार करून त्याची शिकार केली होती.
वन विभागाने या प्रकरणी वन अपराध नोंदवून तपास केला. सहाय्यक वनसंरक्षक प्रितमसिंग कोडापे यांनी न्यायालयात भक्कम पुरावे, जप्त केलेली कातडी-नखे, पंचनामे आणि CCMB (हैदराबाद) चा वैज्ञानिक अहवाल सादर केला. १० वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने सर्व तिन्ही आरोपींना वन्यजीव (संरक्षण) कायद्याच्या कलम ५१ अंतर्गत ३६ महिने (३ वर्षे) सक्तमजुरी आणि प्रत्येकी *१०,००० रुपये दंड. दंड न भरल्यास अतिरिक्त ४ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. आरोपी परशराम नरोटे याला भारतीय वन कायद्याच्या कलम २६ (१) (i) अंतर्गत स्वतंत्रपणे ६ महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड सुनावण्यात आला. गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड आणि दुचाकी जप्त करण्याचे तसेच बिबट्याची कातडी व नखे शासनाच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने ऐतिहासिक निकाल
या प्रकरणात सरकारच्या वतीने अॅड. अविनाश नाकाडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली, तर आरोपींच्या वतीने अॅड. गोकूल नागमोती यांनी युक्तिवाद केला. वन विभागाने या निकालाचे स्वागत केले असून, “वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांना ही शिक्षा म्हणजे एक कडक इशारा आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. प्रदीर्घ काळ चाललेल्या या खटल्याच्या निकालानंतर परिसरात वन्यजीव प्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.



