गडचिरोलीत वाघ-हत्तींची दहशत, तातडीने उपाययोजना करा – माजी आ. डॉ. होळी यांची वनमंत्र्यांकडे मागणी

मुंबईत घेतली सदिच्छा भेट; लवकरच गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे मंत्र्यांचे आश्वासन
गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून हत्ती आणि वाघांनी घातलेल्या धुमाकुळामुळे नागरिक भयभीत झाले असून, यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुंबई येथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्ह्यातील वन विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा पाढा वाचत वनमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर केले.
डॉ. होळी यांनी वनमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की, गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत हस्तक्षेप वाढला आहे. हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पीक फस्त केले असून अनेक गावांमध्ये घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या अनेक नागरिकांना वाघाने लक्ष्य केले असून, जिल्ह्यात आतापर्यंत शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. वन्यप्राण्यांमुळे झालेल्या शेती आणि जीवितहानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि या हिंस्र प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
केवळ वन्यप्राण्यांचा प्रश्नच नव्हे, तर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. होळी यांनी वनमंत्र्यांसमोर खालील मागण्या मांडल्या: वनाधारित उद्योग: गडचिरोलीतील वनसंपदेवर आधारित लघुउद्योगांना चालना देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. वनपट्टे वाटप: वन जमिनीवर अतिक्रमण असलेल्या धारकांना कायदेशीर वनपट्टे देऊन त्यांना न्याय द्यावा. आदिवासी हक्क: जल, जंगल आणि जमिनीवरील आदिवासींचे पारंपरिक हक्क अबाधित राखले जावेत. विकासकामातील अडथळे: वनविभागाच्या जाचक अटींमुळे रखडलेली विकासकामे तातडीने मार्गी लावावीत.
डॉ. देवराव होळी यांनी मांडलेल्या समस्यांची गांभीर्याने दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक आश्वासन दिले. “गडचिरोली जिल्ह्यातील वनविषयक समस्यांचे सर्वोत्तम पद्धतीने निवारण केले जाईल. मी स्वतः लवकरच गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून संबंधित वनाधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेईन,” असे वनमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
या भेटीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले वनहक्क पट्टे आणि वन्यप्राण्यांच्या दहशतीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. माजी आमदार डॉ. होळी यांनी प्रत्यक्ष मुंबई गाठून जिल्ह्याचे गाऱ्हाणे मांडल्याने जिल्ह्यातील शेतकरी आणि आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.



