
गडचिरोली : मासेमारीसाठी इंद्रावती नदीत सहकाऱ्यांसह गेलेल्या एका युवकावर मगरीने हल्ला करून त्याला ठार केले. ही हृदयद्रावक घटना महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत सिरोंचा तालुक्याच्या इंद्रावती नदीत शनिवार, ७ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
समित अंबाला (वय २२, रा. अटूकपल्ली, जिल्हा बिजापूर, छत्तीसगड) असे मृत युवकाचे नाव आहे. सिरोंचा तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागूनच इंद्रावती नदी वाहते. सिरोंचा तालुक्याच्या हद्दीत सोमनपल्ली हे गाव आहे, तर दुसऱ्या बाजूला छत्तीसगड राज्यातील अटूकपल्ली हे गाव आहे. समित अंबाला हा युवक नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी नदीकाठी गेला होता. नदीत जाळे टाकत असताना अचानक मगरीने त्याच्यावर हल्ला केला. मगरीने त्याचा उजवा पाय पकडून त्याला पाण्यात ओढले.
अंबाला यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी तात्काळ आरडाओरडा केला आणि तातडीने बचावकार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत मगरीने त्याला खोल पाण्यात नेले होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर तरुणाचा शोध सुरू करण्यात आला. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गावकऱ्यांनी तरुणाचा मृतदेह नदीबाहेर काढला. मगरीच्या हल्ल्यामुळे तरुणाचा उजवा पाय फॅक्चर झाला होता. या घटनेमुळे सिरोंचा आणि सीमावर्ती भागात शोककळा पसरली आहे.



