
गडचिरोली : प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक आणि ‘एकात्म मानववाद’ या तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त (समर्पण दिन) भारतीय जनता पार्टी, गडचिरोली शहराच्या वतीने विविध शक्ती केंद्रांमध्ये अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पावन स्मृतीस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या राष्ट्रनिष्ठ आणि मूल्याधिष्ठित विचारांचे स्मरण करण्यात आले.
गडचिरोली शहरातील विविध भागात मान्यवरांच्या हस्ते पंडितजींना श्रद्धांजली वाहण्यात आली. विवेकानंद नगर येथे नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. महिला व बालकल्याण सभापती सीमा कन्नमवार यांनीही आपल्या प्रभागात आदरांजली वाहिली. चनकाई नगर येथे बांधकाम सभापती तथा भाजपा शहर अध्यक्ष अनिल कुनघाळकर आणि न.प. उपाध्यक्ष तथा शहर महामंत्री निखिल चरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. महात्मा गांधी नगरयेथे उपशिक्षण सभापती शिल्पा हेमके यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. लांझेडा येथे नगरसेविका कोमल नैताम यांनी पंडितजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. “पंडितजींचे ‘एकात्म मानववाद’ हे तत्त्वज्ञान समाजातील शेवटच्या घटकापर्यंत (अंत्योदय) विकास पोहोचवण्याचा मार्ग दाखवणारे आहे. समाजातील सर्व घटकांना समान न्याय देत राष्ट्र उभारणीसाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमांना नगरसेवक अंकित गव्हारे, नगरसेविका साक्षी बोलूवार, अर्चना निंबोड, नगरसेवक सुधाकर येनगंधलवार, विनोद देवोजवार, अंकित हेमके, निखिल गुंडमवार, उराडे, लाटकर, गणेश नैताम यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान संपूर्ण परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजसेवा आणि राष्ट्रसेवेची वाटचाल अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी केला.



