धावत्या दुचाकीने घेतला पेट ; पत्नी-मुलाच्या डोळ्यांदेखत पतीचा होरपळून मृत्यू

एटापल्ली-बारसेवाडा मार्गावरील भीषण घटना; मदतीसाठी धाव घेतली, पण आगीच्या तांडवापुढे हतबल झाले नातेवाईक
एटापल्ली : नात्याच्या नवीन गाठी बांधण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर नियतीने वाटेतच घाला घातला. नातेवाइकाचे लग्न जुळवून आनंदाने घरी परतत असताना, धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतला. काही कळायच्या आत लागलेल्या भीषण आगीत होरपळून ४२ वर्षीय व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा मार्गावर १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
सिमन दसरू हिचामी (वय ४२, रा. कृष्णार, ता. एटापल्ली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सिमन हे आपल्या नातेवाइकाचे लग्न जुळवण्यासाठी चंदनवेली येथे गेले होते. तिथे सर्व बोलणी यशस्वीरीत्या पार पडली, लग्नाची तारीख निश्चित झाली. सर्व कामे आटोपून आणि आनंदाने जेवण करून सिमन हे आपल्या दुचाकीने (क्र. MH 33 AE 2739) घराकडे निघाले होते. मात्र, घरापासून अवघ्या काही अंतरावर असताना मृत्यूने त्यांना गाठले.
एटापल्ली-बारसेवाडा रोडवर शहरापासून सुमारे ३ किमी अंतरावर असताना, सिमन यांच्या चालत्या दुचाकीने अचानक पेट घेतला. आगीचा भडका इतका भीषण होता की सिमन यांना सावरण्याची किंवा दुचाकीवरून उडी मारण्याची संधीच मिळाली नाही. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि सिमन यांचा जागीच जळून मृत्यू झाला.
या घटनेतील सर्वात क्लेशदायक बाब म्हणजे सिमन यांची पत्नी आणि मुलगा दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या पाठीमागूनच येत होते. आपल्या डोळ्यांदेखत पतीला आगीने घेरलेले पाहून त्यांनी आरडाओरडा करत आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, आगीच्या ज्वाळा इतक्या भयानक होत्या की त्यांना यश आले नाही. पतीचा डोळ्यांदेखत अंत पाहिल्यानंतर पत्नीने केलेल्या आक्रोशाने संपूर्ण परिसर सुन्न झाला होता.
घटनेची माहिती मिळताच एटापल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक लॅबच्या (न्यायवैद्यक शास्त्र) पथकालाही पाचारण करण्यात आले. धावत्या दुचाकीने अचानक पेट का घेतला? हा इंजिनमधील तांत्रिक बिघाड होता की पेट्रोल गळतीमुळे ही आग लागली, याचा तांत्रिक तपास आता पोलीस करत आहेत. या घटनेमुळे कृष्णार गावावर शोककळा पसरली असून, एका लग्नकार्याच्या आनंदाचे रूपांतर क्षणात भीषण दुःखात झाले आहे.



