
जिल्हा ग्रंथालय कार्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा
गोंदिया : चौफेर वाचनाने जगण्यात समृध्दी निर्माण होते. आपल्या विचाराच्या कक्षा वृंदावतात, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर यांनी आज वाचन प्रेरणा दिनानिमीत्त केले.
भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे, जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक कैलाश गजभिये, ग्रंथालय निरीक्षक अस्मिता मंडपे, लिपीक अंकुश कटरे यांच्यासह वाचक वर्ग उपस्थित होते.
कांबळे पुढे म्हणाल्या, दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमीत्त ‘वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृतीला चालना मिळावी हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येकाने महापुरुषांच्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. पुस्तके वाचनाने माणसांचे विचार प्रगल्भ होत असतात असे त्यांनी यावेळी सांगितले.



