गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

नान्ही रेतीघाटातील अवैध उत्खनन प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी समिती नियुक्त

गडचिरोली : कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या नान्ही रेतीघाटात नियमांचे उल्लंघन करून अवैध वाळू उत्खनन झाल्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सहा सदस्यीय उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली आहे व सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सन २०२५-२६ या वर्षासाठी कुरखेडा उपविभागातील नान्ही आणि कुंभीटोला या रेतीघाटांचा ई-लिलाव करण्यात आला होता. यामध्ये देवरी येथील ‘तारामंगल एजन्सी’ यांनी सर्वोच्च बोली लावून हे रेतीघाट मिळवले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने ११ डिसेंबर २०२५ रोजी यासंदर्भात मंजुरीचा आदेशही निर्गमित केला होता.

परंतु, या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की, अटी व शर्तींचा करारनामा तसेच EMP आणि CER बाबतचे हमीपत्र सादर केल्यानंतरच प्रत्यक्ष उत्खननास सुरुवात करता येईल. तरीही, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच नान्ही रेतीघाटातून अंदाजे ६०० ब्रास रेतीचे उत्खनन करण्यात आल्याचे तहसीलदार कुरखेडा यांच्या अहवालातून समोर आले आहे.

तक्रार आणि प्रशासकीय कारवाई

कुरखेडा येथील रहिवासी यांनी १५ डिसेंबर २०२५ रोजी या अवैध उत्खननाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. तहसीलदारांच्या अहवालानुसार, उत्खनन केलेली रेती अद्याप घटनास्थळीच असून तिची वाहतूक झालेली नाही, असे म्हटले असले तरी, ठोस पुराव्याअभावी अवैध वाहतुकीची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनाचे मत आहे.

या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खालील अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे: अध्यक्ष: सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, गडचिरोली. सह-अध्यक्ष: सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, एटापल्ली. सदस्य: कार्यकारी अभियंता (सा.बां. विभाग), उपअधीक्षक (भूमी अभिलेख) आणि सहाय्यक जिल्हा खनिकर्म अधिकारी. सदस्य सचिव: तहसीलदार, धानोरा.

सदर समितीला प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून, वस्तुनिष्ठ तपासणी करून आपला स्वयंस्पष्ट अभिप्राय सात दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button