क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

कोंबड्यांच्या झुंजींवर जुगार ; १३ आरोपींना अटक

दोन ठिकाणच्या कारवाईत ४ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

गडचिरोली : जिल्ह्यात पोलिसांनी कोंबड्यांच्या झुंजींच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई केली आहे. अहेरी पोलिसांनी टेकुलगुडा आणि तलवाडा गावांमध्ये २३ ऑगस्ट रोजी केलेल्या या कारवाईत १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून सुमारे ४ लाख ८६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहेरी पोलिसांना टेकुलगुडा गावात कोंबड्यांच्या झुंजींवर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुपारी छापा टाकला. यावेळी काही लोक कोंबड्यांच्या पायांना धारदार शस्त्रं (कात्या) बांधून त्यांच्यात झुंज लावत होते आणि त्यावर पैशांची बाजी लावत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून ४ आरोपींना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात तीन कोंबड्या, कात्या, दोरी आणि पाच दुचाकींचा समावेश आहे.
याच दिवशी संध्याकाळी तलवाडा गावातही पोलिसांनी छापा टाकत जुगाराच्या दुसऱ्या अड्ड्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ६,१५० रुपये रोख रक्कम, सहा जिवंत कोंबड्या, सहा कात्या आणि चार दुचाकी असा एकूण २ लाख ४३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही प्रकरणांमध्ये ‘महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७’ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षल व्ही. ऐकरे यांनी केली.

पोलिसांनी कठोर इशारा दिला आहे की, अशा प्रकारे कोंबड्यांच्या झुंजींवर पैज लावणे किंवा जुगाराचा धंदा करणे खपवून घेतले जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अशा कारवायांमुळे प्राण्यांवरील क्रूरता थांबण्यास आणि समाजात वाढणारी गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल, असे गावकऱ्यांनी म्हटले आहे. गावकऱ्यांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले असून, सामान्य कुटुंबांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी अशा कारवाया सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button