
प्रलंबित प्रकरणांमुळे शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित ; जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने निराकरणाचे आश्वासन
गडचिरोली : “धानोरा तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून वनपट्ट्यांच्या मंजुरी, नोंदीतील त्रुटी आणि मालकी हक्काच्या समस्यांशी झुंज देत आहेत. या तांत्रिक अडचणींमुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांना हक्काच्या शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासनाने ही प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा,” अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली.
धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह ब्राह्मणवाडे यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर सविस्तर चर्चा केली. भेटीदरम्यान ब्राह्मणवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले की, अनेक शेतकऱ्यांचे वनपट्टे मंजूर असूनही कागदोपत्री नोंदींमध्ये चुका असल्याने त्यांना बँकांचे कर्ज किंवा इतर कृषी योजनांचा लाभ घेता येत नाही. तसेच, अनेक जुनी प्रकरणे अद्याप प्रशासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणांचा कालबद्ध आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर कराव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रलंबित वनपट्ट्यांच्या प्रकरणांचा तातडीने आढावा घेण्याचे आणि त्रुटींचे निराकरण करण्याचे निर्देश दिले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. यामुळे धानोरा तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधवांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
यावेळी काँग्रेसचे धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, शेरखान पठाण, विपुल येलट्टीवार, देवराव चवळे, मनोहर नरोटे, रामसाय हलामी, वासुदेव मेश्राम, मधुकर गावडे, अमरु जाळे, रावणशहा तुलावी, सखाराम नैताम, संताराम गावळे, राकेश पोटावी, विनोद मडावी, फत्तेसाय आचला आणि सुरेश आचला यांच्यासह धानोरा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पाठपुराव्यामुळे धानोरा तालुक्यातील वनपट्टा धारक शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यास गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



