
कारच्या धडकेमुळे ट्रक उलटला; कारचा चक्काचूर, तीन दिवसात दुसरी भीषण घटना
वर्धा : पुलगावपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावरील विरूळनजीक समृद्धी महामार्गावर शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या एका भरधाव कारने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नागपूरच्या पाच रहिवाशांसह ट्रक चालक व क्लीनर असे एकूण सात जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कारमधील एका प्रवाशाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते.
विरूळ परिसरात अवघ्या तीन दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली आणि मारडा परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत चार जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा हा भीषण अपघात घडल्याने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलीस व प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाची कार (क्र. एमएच ४९-बीआर ७०४७) मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात होती. विरूळ परिसरात कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार त्याच दिशेने जाणाऱ्या एका ट्रकवर (क्र. सीजी १६-सीएस ४०८६) पाठीमागून अत्यंत वेगाने आदळली. ही धडक इतकी प्रचंड होती की, ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक महामार्गावरच पलटी झाला. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा पार चक्काचूर झाला आहे.
या अपघातात कारमधील प्रवासी अफझल हुसेन (३८), सिराज हुसेन (३३), अवेज ऊर्फ पाशू प्यारे खान (२१), दानिश प्यारे खान (३०) आणि परवेज खान (सर्व रा. नागपूर) हे जखमी झाले. हे सर्वजण नागपूर येथील एकता कॉलनी, महेंद्रनगर परिसरातील रहिवासी असून मुंबईवरून नागपूरला परतत होते. याशिवाय, ट्रक चालक सलीम सौदागर आणि क्लीनर सुरेश कुमार हे दोघेही अपघातात जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गाचे सुरक्षा पथक आणि पुलगाव येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी आणि स्थानिक नागरिकांनी कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. सर्व जखमींना प्रथमोपचारासाठी प्रथम पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेता प्राथमिक उपचार करून सर्व सातही जखमींना पुढील उपचारासाठी वर्धा येथील सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.



