गडचिरोलीविदर्भ

परीक्षेच्या दिवशीच तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

कोनसरी येथील घटना ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

आष्टी : येथील एका २२ वर्षीय तरुणीने १० जून रोजी सकाळी १० वाजता कोनसरी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव अंजली राजू खडसे (वय २२ वर्षे, रा. आष्टी) असे आहे.

अंजलीची आई, सुरेखा (खडसे) आत्राम, या कोनसरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका आहेत. त्या आष्टी येथील आपल्या घरी दोन मुलींसोबत राहत असताना, सकाळी अंजली घरातून केव्हा निघून गेली, हे त्यांना कळले नाही. अचानक मुलीच्या मृत्यूची बातमी मिळाल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अंजलीचे लग्न मूल येथील अनुराग कन्नाके यांच्यासोबत जुळले होते. अंजलीचा १० जून रोजी परीक्षेचा पेपर असल्याने तिला शाळेत पोहोचवण्यासाठी अनुराग आष्टी येथे आला होता. त्याचवेळी तिला आत्महत्येची बातमी कळाली. आपल्या भावी पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि तो रडू लागला.

९ जून रोजी रात्री ९ वाजता अंजली आणि अनुराग यांच्यात संभाषण झाले होते. मात्र, आज सकाळी अनुरागने अंजलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिला प्रतिसाद मिळाला नाही, असे तो सांगत आहे. अंजलीने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण सध्यातरी स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलीस तपासानंतरच सत्य समोर येईल अशी शक्यता आहे.

घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री जगताप आणि पोलीस पथक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button