
गडचिरोली : बदलत्या जीवनशैलीत अनेकांना दारूच्या व्यसनाने ग्रासले आहे. हे व्यसन केवळ मद्यपीचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करते. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी व्यसन उपचार ही काळाची गरज बनली असून, गडचिरोली जिल्ह्यातील ‘मुक्तिपथ’ अभियानांतर्गत विविध तालुका मुख्यालयांत कार्यरत असलेली व्यसन उपचार क्लिनिक्स रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहेत.
मुक्तिपथतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या या क्लिनिकमध्ये रुग्णांना तज्ज्ञांकडून योग्य औषधोपचार, समुपदेशन आणि मोलाचा सल्ला दिला जातो. केवळ उपचार करून न थांबता, उपचार घेतलेल्या रुग्णांचा नियमित पाठपुरावा देखील केला जातो. या सातत्यपूर्ण प्रक्रियेमुळे रुग्णांना मानसिक बळ मिळून दारूचे व्यसन कायमचे सोडण्यास मोठी मदत होत आहे.या आठवड्यात जिल्ह्यातील पाच क्लिनिक्समध्ये एकूण ४७ रुग्णांनी उपचार घेऊन व्यसनमुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आरमोरी: १३ रुग्ण, अहेरी: १० रुग्ण, देसाईगंज: ०९ रुग्ण, सिरोंचा: ०८ रुग्ण कुरखेडा: ०७ या रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत अनेक रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला असून त्यांचे विस्कळीत झालेले संसार पुन्हा सावरण्यास सुरुवात झाली आहे. व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या इतर नागरिकांनीही भीती किंवा संकोच न बाळगता जवळच्या मुक्तिपथ व्यसन उपचार क्लिनिकला भेट देऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.



