
पर्यावरण संरक्षणासाठी १६५ कोटींची तरतूद आणि ६९ हजार वृक्षलागवडीचे नियोजन
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी गती देणाऱ्या ‘वरद फेरो अलॉयज प्रा. लि.’ या कंपनीच्या प्रस्तावित २५०० कोटी रुपयांच्या एकात्मिक स्टील प्रकल्पाची पर्यावरणीय जनसुनावणी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडली. या प्रकल्पामुळे जिल्ह्याला नवी औद्योगिक ओळख मिळणार असून, स्थानिक युवकांसाठी रोजगाराची मोठी कवाडे उघडली जाणार आहेत.
या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे १२०० ते १५०० रोजगार निर्माण होण्याचा अंदाज कंपनीने वर्तविला आहे. विशेष म्हणजे, स्थानिक युवकांची शैक्षणिक पात्रता आणि तांत्रिक कौशल्ये विचारात घेऊन त्यांना भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन कंपनी प्रशासनाने दिले. याशिवाय, प्रकल्पाच्या आसपासच्या गावांमध्ये पाणीपुरवठा, आरोग्य, रस्ते आणि स्वच्छतेच्या सोयींसाठी स्वतंत्र निधी खर्च केला जाणार आहे.
प्रकल्पाचा पर्यावरणावर परिणाम होऊ नये, यासाठी कंपनीने मोठा आराखडा सादर केला आहे: भांडवली खर्च: पर्यावरण संरक्षणासाठी १६५ कोटी रुपये राखीव. वार्षिक खर्च: प्रदूषण नियंत्रण प्रणालीच्या देखभालीसाठी दरवर्षी १७ कोटी रुपये खर्च होणार. हरितपट्टा विकास: प्रकल्पाच्या एकूण क्षेत्रापैकी ३५ टक्के (२७.६२ हेक्टर) जागेवर हिरवळ असेल. वृक्षलागवड: सुमारे ६९,०५० झाडे लावली जाणार असून, प्रकल्पाच्या सीमांवर १५ मीटर रुंदीचा घनदाट हरितपट्टा उभारला जाईल.

या जनसुनावणीला माजी मंत्री तथा अहेरीचे आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम आणि गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार आत्राम म्हणाले की, “गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनवण्यासाठी अशा मोठ्या उद्योगांची गरज आहे. मात्र, हे करत असताना स्थानिक शेतकरी आणि नागरिकांना योग्य मोबदला मिळणे आणि पर्यावरणाचे रक्षण होणे ही आमची प्राथमिकता आहे.” आमदार नरोटे यांनीही स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यावर भर दिला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) चंद्रपूर येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांचे पथक या सुनावणीला उपस्थित होते. उपस्थित नागरिक आणि शेतकरी यांच्या शंकांचे निरसन यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी केले.



